दिले होते तुला
देवाने खुप काही,
मोकळेच होते रस्ते,
अण् मोकळ्या होत्या दिशा दाही
कणा नव्हता मोडलेला
मानही होती ताठ
मग लढायचे सोडुन तु का
जीवनाकडे फिरवली पाठ
ज्यांनी तुला दिला त्रास
ते जिंकले सारे हरुनही
दिवसरात्र कष्ट केले
पण तू हरलास जिंकुनही
लाखोंनी स्वप्न पाहीली
तुझ्याकडे पाहून
हरले नाहीत ते सुद्धा
ज्यांचे घरटे गेले वाहून
हात नाही, पाय नाही
दिसण्याची सोय नाही
सुंदर ह्या जगाचा मोह
त्यांनी देखील सोडला नाही
आई नाही बाप नाही,
तोंडाला घास नाही
येवढं सगळं असुनही
सोडला त्यांनी ध्यास नाही
शेतीला पाणी नाही
पाण्याला शेत नाही
दोन्ही जरी असलेच तरी
मालाला भाव नाही
त्यांनी देखील बरे झाले
तुझ्याकडे पाहिले नाही
नाहीतर त्यांना वाटले असते
जगणे आपला घास नाही
यशस्वी तुझ्यापरी
जीवनावर जेंव्हा पाणी सोडतो
हतबल होऊन आमच्यासारखे
सुख-दु:खांचे हिशेब लावतो
सुख आणि दुःख,
नाण्याच्या दोन बाजू
दु:ख असता नका लाजू
सुखात देखील नका माजू
पुलाखालून पाण्यासम दु:ख
वाहून जाईल दूर
वेळ जाता सुखांचा
आयुष्यात येईल पुर
~ दत्ता चत्तर
No comments:
Post a Comment