Saturday, April 11, 2020

मराठा

ही कविता माझ्या मराठी बांधवासाठी आहे जे मराठीवर प्रेम करतात आणि छत्रपती शिवजी राजांना आपले दैवत मानतात. राजांकडून शिकण्यासारखे एवढे असताना आपण मात्र हवं तेवढंच घेतो आणि जे घ्यायचं ते घेत नाही. म्हणून एक छोटासा प्रयत्न.

मराठा
मराठा फक्त कागदी नसतो,
कागदी तर घोडा नाचतो।
भगवा घातल्याने शिवा नसतो,
मराठीबाणा आचरणी लागतो।
मराठा फक्त तोही नसे,
जिभेवरच जयाच्या फक्त शिवा वसे!
खरा मराठा तोची असे,
जया अंगी स्वाभिमान दिसे।
दिल्या शब्दा जागे तो पाईक शिवाचा,
प्रसंगी सवंगडी होई जिवाचा!
जो सदा मान ठेवी वयाचा,
मनावर ताबा सदैव जयाचा!
विश्वास ठेवी येवढा की,
तमा नसे त्यास दग्याची!
कठीन समय जर येई,
न घेई भूमिका बघ्याची!
ज्यास पर्वा समस्त जगाची,
दंतही मोजी जो मस्तवाल वाघाची।
नसे ज्याला भिती अपयशाची,
अपयश तर पायरी यशाची!
जया न आवडे लाचारी,
न तो कधी व्यभिचारी,
जरी त्यास मिळे कुणी परोपकारी
आयुष्यभर तयाचा तो ऋणी, राजा असो वा भिकारी।
अशी माझ्या राजाची शिकवण,
वागण्यातुनच खरे करू तयाचे पुजण,
स्फुर्ती जाणत्या शिवाची,
दत्ता करीतसे मात्र प्रवचण।।
-दत्तात्रय चत्तर

No comments:

Featured Post

नाव

Popular Posts